सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीवर सोमवारी पहाटे दरोडा पडला आहे. या घटनेत चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण करून 5 तोळे सोने लुटले असल्याची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर कर्नाटक सीमा भागात घडली.
फिर्यादी सोनम सूरपुरय्या या बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसमधील एस-8 या बोगीत होत्या. बोरोटी रेल्वे स्टेशनच्या अलीकडे कोणीतरी अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नलचे वायर तोडले होते. त्यामुळे एक्सप्रेस थांबली. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी खिडकीतून हात घालून सोनम यांच्या डोक्याखालील पर्स ओढून घेतली. पर्समध्ये मनगटी घड्याळ, 1 तोळे सोने असा साहित्य होता. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या सौ. कोहली सांबा यांच्या पत्नीच्या गळ्यातील 5 तोळे वजनाचे मंगळसूत्र दरोडेखोरांनी हिसका मारून पळवून नेला.
दरोडेखोरांनी बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर दरोडा घालून दगडफेक देखील केली आहे. यात एका प्रवाशाच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यावर सोलापूर रेल्वे स्थानकात प्रथमोपचार करण्यात आले. तसेच कोहली सांबा यांच्या पत्नीच्या गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे सोलापूर मध्य रेल्वे प्रशासन हादरले असून, दरोडेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे.






