छेडखानीला विरोध केल्याने तरुणांनी घातल्या मुलीच्या आईला गोळ्या

पाटणा (बिहार) – उत्तर प्रदेशातील मुलीची छेड काढल्याची तक्रार करणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, बिहारमधील फतुहा परिसरातही मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या महिलेची आरोपींनी निर्घृण हत्या केली. आरोपी गावातीलच आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा शहरातील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मुलीची गुंडापासून सुटका करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली. फतुहा हद्दीतील जग्गू बिगहा गावात ही घटना घडली. गावातील तरुणांनीच ही हत्या केली. घराच्या दारात उभ्या असलेल्या महिलेच्या डोक्यात गोळ्या घातल्या. जखमी महिलेला तात्काळ फतुहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेच्या पतीने सांगितले की, त्यांना तीन मुली आहेत. गावातील काही तरुण मुलींची छेड काढत होते. त्यांची आई या तरुणांना विरोध करत होती. यावरून वाद झाला आणि तरुणांनी तिची हत्या केली. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here