म्यानमारमध्ये लष्करशाहीविरोधात आंदोलन सुरूच; संघर्षात आणखी ३८ जणांचा मृत्यू

यंगून – म्यानमारच्या सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बलाचा प्रयोग सुरूच ठेवला असून बुध‌वारी ३८ जणांचा त्यात बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेचे विशेष दूत ख्रिस्टाइन बर्गनर यांनी म्हटले आहे. बर्गनर यांनी स्वित्झर्लंडमधून बोलताना, लष्करी अधिकारी आंदोलकांवर गोळीबार करण्याबरोबरच रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करीत असल्याचे म्हटले आहे.

म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात लोकशाहीवादी सरकार उलथवून लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. देशातील निदर्शने दडपून टाकण्याचा प्रयत्न लष्कर करीत असून त्यात नेमकी किती जीवितहानी झाली ते समजणे अवघड असल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय चिंताग्रस्त आहे. गोळीबार आणि गंभीर मारहाणीत आतापर्यंत ५० जणांचा बळी गेला आहे. देशात बुधवारी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आतापर्यंत सर्वाधिक होती, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी गुरुवारी सकाळी मंडाले शहरावरून पाच लढाऊ विमानांनी गिरट्या घातल्या. लष्करशाहीविरोधात लोकांनी आंदोलन तीव्र केले आहे. लष्करशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन सुरू असताना आंदोलकांविरोधात सुरू असलेला हिंसाचार भयावह असून आम्ही दु:खी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here