चंदीगड – शुक्रवारी सकाळी काही अज्ञात चोरट्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचं एटीएम मशीनचं चोरून नेलं आहे. यावेळी त्याने एटीएम मधील पैसे चोरण्यासाठी थेट मशीन गाडीला बांधून उपटले आहे. यानंतर चोरट्यांनी हे मशीन गाडीत टाकून घटनास्थळावरून पोबारा केला आहे.
या मशीनमध्ये 22 लाख 88 हजार रुपयांची रोकड असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून पोलीस चौकी केवळ 300 मीटर अंतरावर आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सरहिंद येथील जकात क्रमांक 4 जवळ घडली आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास काही चोरटे काळ्या रंगाच्या कारमध्ये आले. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनला दोरीने बांधलं, मग गाडी टो करून मशीन बाहेर काढली. कारने मशीन खेचताच एटीएम मशीन उपटून निघाली. त्यानंतर चोरट्यांनी मशीन गाडीत टाकून पसार झाले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांनी सांगितलं की, गुरुवारी मशीनमध्ये 18 लाख 88 हजार रुपये भरण्यात आले होते. मशीनमध्ये नोटा लोड करण्यापूर्वी त्यात अगोदरपासून 4 लाख रुपये होते. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचंही मॅनेजरनी सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग घेत आहेत.






