पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

इस्लामाबाद – पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या मनात दहशत निर्माण करणारं दुसरं प्रकरण समोर आलं आहे. रहीम यार खान शहरापासून अवघ्या १५ किलोमीटरवर एका हिंदू कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील रहीम यार खान शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर असणाऱ्या अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबाची काही अज्ञातांनी हत्या केली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. येथील रामचंद मेघवाल यांच्या कुटुंबातील सर्वांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि शिख अल्पसंख्यांकामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द न्युज इंटरनॅशनल’ ने दिलेल्या वृत्तानुसार, अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू परिवारातील सर्व सदस्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि कुऱ्हाड जप्त केली आहे. हल्लेखोरांनी याच हत्यारांनी संबंधित परिवाराचं हत्याकांड केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मृत रामचंद्र मेघवाल शांततापूर्ण मार्गाने अबुधाबी कॉलनीत राहत होते. परिसरातच त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. पण आजचा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ही हत्या कोणी केली? किंवा या हत्येंमागचं नेमकं कारण काय आहे? याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या कट्टरपंथीयांना लगाम घालणं पाकिस्तानातील इम्रान खान सरकारला अधिकच अवघड जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here