कोलकाता – केंद्रातील सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपमध्ये उमेदवारीवरून राडा सुरू झाला आहे. राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना डावलत आयारामांना संधी दिल्याने जुने कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयातच तोडफोड केली.
विधानसभा निकडणुकीची घोषणा झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, माकपमधून अनेक नेते व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्याने मूळ भाजप कार्यकर्ते व नेते अस्वस्थ झाले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते आणि त्यांच्या समर्थकांनी दक्षिण कोलकातास्थित हेस्टिंग येथील भाजपच्या कार्यालयात जोरदार राडा केला. एकढेच नव्हे तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, शिक प्रकाश आणि अर्जुन सिंह यांना धक्काबुक्कीही केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकात्यात सोमवारी येणार होते, पण पश्चिम बंगालमध्ये उमेदवारीवरून उफाळून आलेल्या नाराजीमुळे त्यांनी आपला दौराच रद्द केला. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष व अन्य नेत्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक वर्ग भाजपसोबत जोडला जात आहे. उमेदवारीसाठीदेखील जास्त अर्ज आले. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात थोडीशी नाराजी आहे. एक-दोन दिवसांत नाराजी निवळेल आणि सर्वकाही ठीक होईल. खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देणे हा निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे प्रदेश प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार लॉकेट चॅटर्जी, स्वपन दासगुप्ता आणि निशिथ प्रमाणिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून उमेदवारीला विरोध केला आहे. लॉकेट चटर्जी यांच्याकिरोधात अपक्ष उमेदकार उभा करण्याची तयारी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.






