आसाममध्ये वायुसेनेच्या मालवाहू विमानाला भीषण अपघात

आसाम

जोरहाट (आसाम) (वृत्तसंस्था) | आसाममधील जोरहाट हवाई दल तळावर भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. हवाई दलाचे अँटोनोव्ह एएन-३२’  हे मालवाहू  विमान धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात घडला. विमान धावपट्टीला स्पर्श करताच त्याला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेमुळे हवाई दल तळावर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एएन-३२ हे विमान एका नियमित मोहिमेवर होते आणि लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. शनिवारी जोरहाट हवाई दलाच्या तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. धावपट्टीवर विमानाचे चाक टेकताच विमानाने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, विमानाचे दोन तुकडे झाल्याचे प्राथमिक वृत्त असून परिसरात धुराचे मोठे लोट हवेत पसरले होते.

अपघात घडताच हवाई दल स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विमानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले असून, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

विमानामध्ये किती कर्मचारी होते आणि या दुर्घटनेत नक्की जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप वायुसेनेकडून अधिकृत आणि सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काही जण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उत्तर-पूर्व (ईशान्य) भारताच्या सुरक्षेच्या आणि रसद पुरवठ्याच्या दृष्टीने जोरहाट हवाई तळ अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक केंद्र मानला जातो. या तळावरूनच दुर्गम भागात लष्करी रसद पुरवली जाते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली की अन्य काही कारण होते, याचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here