जळगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) | आगामी १८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपत आली असताना, महायुतीमधील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा मिळवून देण्यासाठी नेत्यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.
राज्याचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे संकटमोचक आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिक येथील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचे मन वळवून, त्यांना शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दराडे यांच्या पाठीशी उभे करण्यात महाजन यांना यश आले आहे. नाशिकचा हा तिढा सुटल्याने आता जळगावमधील पेचही लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीच्या गोटातून व्यक्त होत आहे.
नाशिकचा फॉर्म्युला यशस्वी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्ण लक्ष आता जळगावच्या जागेवर केंद्रित झाले आहे. जळगावात सद्यस्थितीत रिंगणात असलेल्या उर्वरित उमेदवारांशी संपर्क साधून त्यांनी माघार घ्यावी किंवा महायुतीला पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी जळगावात महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि बंडखोरीवर कशा प्रकारे सुवर्णमध्य काढता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली आणि पुढील व्यूहरचना आखण्यात आली.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे काही कारणास्तव उपस्थित नसल्यामुळे, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जळगावमधील पाठिंब्याचा आणि बंडखोरीचा प्रश्न जवळजवळ सुटण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्माताई काळे आणि जळगावच्या महिला नेत्या तथा किंगमेकर सरिताताई कोल्हे यांच्याशी येत्या दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवरून संपर्क साधून यावर शंभर टक्के सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत आहेत. नाशिकमधील तडजोडीनंतर आता जळगावातही बंडखोर उमेदवार माघार घेतील किंवा पक्षादेश पाळतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या राजकीय वर्तुळात वन-बाय-वन किंवा त्रिकोणी लढत पाहायला मिळेल असे वातावरण दिसत असले, तरीही शिंदे गटातील अंतर्गत बंडखोरीचा प्रश्न येत्या ४८ तासांत पूर्णपणे मार्गी लागेल, असा विश्वास स्थानिक नेत्यांना आहे.
हा तिढा सुटल्यास महायुतीची ताकद जळगाव जिल्ह्यात कमालीची वाढलेली दिसेल. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे संख्याबळ आधीच जास्त आहे. त्यामुळे बंडखोरी शमल्यास महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन हे सहज निवडून येऊ शकतात; एवढेच नव्हे तर त्यांना ४०० च्या वर मतांचा कोटा मिळू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
आम मतदारांना ही लढत चुरशीची व्हावी असे वाटत असले, तरी महायुतीने आखलेल्या भक्कम मोर्चेबांधणीमुळे चुरस होण्याची शक्यता आता धूसर झाली असून, महायुतीचे पारडे जड दिसत आहे.







