अहिल्यानगर (प्रतिनिधी) | शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या आरोग्याशी खाजगी दुकानदारांकडून खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाच्या आणि चक्क बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी भाविकांकडून वाढल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन आता पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’वर आले असून, प्रसादाच्या दुकानांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दररोज हजारो आणि वर्षाकाठी लाखो भाविक श्रद्धेने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. दर्शनानंतर मंदिर परिसरातील खाजगी दुकानांमधून भाविक मोठ्या प्रमाणावर पेढा प्रसाद खरेदी करतात. मात्र, या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या पाकिटांवर ना पॅकेजिंगची तारीख आहे, ना एक्सपायरी डेट! हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो, याची कोणतीही माहिती त्यावर उपलब्ध नसते. अनेक वर्षांपासून भाविकांना अक्षरशः दगडासारखे कडक आणि निकृष्ट पेढे विकले जात असल्याचे आता उघड झाले आहे.
बुरशीयुक्त प्रसादाच्या तक्रारी समोर येताच अन्न व औषध प्रशासनाचे विशेष पथक शिर्डीत दाखल झाले आहे. प्रशासनाने विविध दुकानांवर छापे टाकून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे शिर्डीतील भेसळयुक्त आणि निकृष्ट प्रसादाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीला भेट देऊन या गंभीर परिस्थितीवर मोठे भाष्य केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “साईभक्तांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
पुढे बोलताना त्यांनी भाविकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. “खाजगी दुकानांमधील प्रसादाच्या दर्जाबाबत शंका असल्याने, शिर्डीत येणाऱ्या सर्व भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून केवळ ‘साई संस्थानच्या कर्मचारी सोसायटी’मधूनच पेढ्यांची व प्रसादाची खरेदी करावी,” अशी कळकळीची विनंती डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे आता शिर्डीतील प्रसादाचा काळाबाजार आणि भेसळ थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







