तासगाव पोलिसांची धडक कारवाई: नागाव कवठे येथील मंदिर चोरीचा छडा; पोलिसांवर दगडफेक करून मुख्य आरोपीला पळवणारे चौघे जेरबंद

तासगाव

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | नागाव कवठे (ता. तासगाव) येथील ऐतिहासिक श्री नागनाथ मंदिर आणि श्री लक्ष्मीमाता मंदिरातील गाभाऱ्यातून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींसह एकूण २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपास दरम्यान आरोपींच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक करून मुख्य आरोपीला पळवून लावण्याचा थरारक प्रकारही घडला होता, मात्र पोलिसांनी कसोशीने शोध घेत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

नागाव कवठे येथील सुरेश भिमराव पाटील (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ मे २०२६ च्या रात्री ८.३० ते दि. १९ मे २०२६ च्या सकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी श्री नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीचे दागिने आणि लक्ष्मीमाता मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा (रजि. नं. २१५/२०२६) दाखल करण्यात आला होता.

सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी यांनी मंदिर चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, सुरज जगदाळे आणि पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी हे तुळशी फाट्याजवळील भारती हॉस्पिटल (येळावी) येथे बबल्या पपल्या शिंदे व जयश्री शिवाजी चव्हाण यांच्या घरी लपले आहेत. पोलिसांनी तातडीने महिला अंमलदारांसह तिथे छापा टाकला. मुख्य आरोपी मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात मास्क, कटावणी आणि बॅटरी असे चोरीचे साहित्य मिळून आले. पोलीस त्याची चौकशी करत असतानाच, बबलू पपलू शिंदे आणि जयश्री चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबासह पोलीस पथकावर व शासकीय वाहनावर जोरदार दगडफेक केली आणि मुख्य आरोपी मच्छिंद्र याला पळवून लावण्यात मदत केली.

दगडफेकीच्या गोंधळात मुख्य आरोपी पळून गेला तरी पोलिसांनी घटनास्थळावरून त्याचे इतर दोन साथीदार प्रशांत शिंदे आणि अरविंद चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यांची कडक शब्दात चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून नागनाथ मंदिरातील चांदीची ६ फुले आणि चांदीचे छत्र (एकूण २९० ग्रॅम) हस्तगत करण्यात आले.

यानंतर पळून गेलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जत तालुक्यातील बेळोंडगी गावामध्ये सापळा रचला. पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन मुख्य आरोपी मच्छिंद्र चव्हाण याला बेळोंडगी येथून पुन्हा ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा उर्वरित सोन्या-चांदीचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी  प्रशांत हिम्मत शिंदे (वय ३० वर्षे, रा. भारती हॉस्पिटल शेजारी, येळावी, ता. तासगाव) २. अरविंद राजू चव्हाण (वय २१ वर्षे, रा. सांडगेवाडी, ता. पलूस) ३. मच्छिंद्र श्रीशैल्य चव्हाण (वय ३० वर्षे, रा. बेळोंडगी, ता. जत) – मुख्य आरोपी ४. अरविंद श्रीशैल्य चव्हाण (वय २८ वर्षे, रा. बेळोंडगी, ता. जत) यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याजवळून देवाच्या कमानीवरील चांदीची ९ फुले (वजन ५०० ग्रॅम) – किंमत २४,७५० रुपये, देवाच्या डोक्यावरील चांदीचे छत्र (वजन ९० ग्रॅम) – किंमत ७,००० रुपये, सोन्याची बोरमाळ (वजन १० ग्रॅम) – किंमत ४५,००० रुपये, सोन्याचे मणी-मंगळसूत्र (वजन ७ ग्रॅम) – किंमत २८,००० रुपये, सोन्याच्या २ वाट्या व ४ मणी (वजन ३ ग्रॅम) – किंमत ८,००० रुपये, होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (MH 10 EY 1799) – किंमत १,००,००० रुपये, होंडा ड्रीम न्युओ मोटरसायकल (MH 10 DC 0374) – किंमत ८०,००० रुपये असा एकूण किंमत: २,९२,७५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक आरती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (जत विभाग, अतिरिक्त कार्यभार तासगाव) सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले, सपोनि दीपक पाटील, अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, संतोष माळी, विठ्ठल सानप, विवेक यादव, सुरज जगदाळे, निलेश डोंगरे, अभिजित गायकवाड, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील आणि उमदी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अवघ्या काही तासांत मंदिरातील चोरीचा छडा लावल्याबद्दल तासगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here