आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; मिरज शहरातून कुख्यात ‘विनायक ढंग’ टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

'विनायक ढंग' टोळी

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कुख्यात गुन्हेगार विनायक बबन ढंग आणि त्याच्या टोळीतील ५ जणांना सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.

 

मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत विनायक बबन ढंग (वय १९, रा. गणेश तलाव, मिरज) याच्यासह रोहित राजु घोडके ऊर्फ गोसावी (वय २६), अरुण शंकर घोडके ऊर्फ गोसावी (वय १९), करण राजु घोडके ऊर्फ गोसावी (वय २९, सर्व रा. गोसावी गल्ली, मिरज) आणि अथर्व अभिजित माने (वय १९, रा. गणेश तलाव, मिरज) या पाच जणांची एक गुन्हेगारी टोळी सक्रिय होती. या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२६ या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणे, मोटारसायकलची तोडफोड, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे यांसारखे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या टोळीचे वाढते कृत्य आणि कायद्याची भीती नसलेले वर्तन पाहता, मिरज शहर पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे चौकशी झाल्यानंतर, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सविस्तर सुनावणी घेऊन व कागदपत्रांचे अवलोकन करून या पाचही जणांना सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.

आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वचक बसवण्यासाठी यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग आणि मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here