सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे दागिने चोरी करणाऱ्या तामीळनाडूतील एका सराईत महिला गुन्हेगाराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटकेत असलेल्या महिला आरोपीकडून १० लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचे ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली होती.
हे पथक सांगली परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना खात्रीशीर बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित महिला सांगली एसटी स्टँडच्या पाठीमागील गल्ली क्रमांक २ मध्ये संशयास्पद रित्या फिरत आहे. त्यानुसार पथकाने तात्काळ तिथे पोहोचून सापळा रचला.
एक महिला पर्स घेऊन तिथे थांबलेली दिसताच, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखालील महिला पोलीस अंमलदार सपना गराडे आणि प्रतीक्षा गुरव यांनी पळून जाण्याची संधी न देता तिला जागीच ताब्यात घेतले.
तिची कसून चौकशी केली असता तिने तिचे नाव मोनीषा मणीगंडण (वय २८ वर्षे, रा. जोलार पेठ, बाबुनगर, ता. वेल्लोर, जि. वेल्लोर, राज्य – तामीळनाडू) असे असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष तिच्या पर्सची झडती घेतली असता, त्यात ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुबे, सोन्याच्या अंगठ्या आणि ५०० रुपयांची एक नोट असा एकूण १०,२८,५०० रुपयांचा ऐवज मिळून आला.
अधिक चौकशी केली असता, या आंतरराज्यीय महिला चोरटीने गेल्या मार्च महिन्यात (२८ मार्च २०२६ रोजी) मिरज शहर एसटी स्टँडवरून बसमध्ये चढत असलेल्या लक्ष्मी रामगोडा रोगे (रा. ब्रह्मनाळ, ता. पलूस) या महिला प्रवाशाच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेऊन हे दागिने चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १०२/२०२६) दाखल होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली मोनीषा मणीगंडण ही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. तिने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर तामीळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे केले असून तिच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार तसेच पोलीस अंमलदार सपना गराडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर टिंगरे, अमर नरळे, दर्याप्पा बंडगर, सतीश माने, संदीप नलावडे, विक्रम खोत, प्रतीक्षा गुरव, सुनीता शेजुळ, दुर्गा कुमरे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.







