सांगली : तासगावात दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश : २ आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाला अटक

सांगली

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | सांगली जिल्ह्यामध्ये मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. एलसीबीच्या पथकाने तासगाव परिसरात सापळा रचून दोन सराईत चोरट्यांना व एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ५ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यांतील एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले होते.

दरम्यान, २१ जून २०२६ रोजी पोलीस अंमलदार सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तासगाव ते गोटेवाडी रोडवरील ‘एम एम पार्क’ जवळ तीन मुले चोरीची मोटार सायकल विकण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तातडीने एम एम पार्क परिसरात निगराणी सुरू केली.

निगराणी दरम्यान, पोलिसांना एका बिना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या दुचाकीजवळ तीन संशयित मुले उभी असलेली दिसली. पोलिसांनी कोणतीही संधी न देता झडप घालून तिघांना जागीच ताब्यात घेतले. त्यांची नावे विचारली असता: १) ऋतुराज कुमार मंडले (वय १९ वर्षे, रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव) २) अनिकेत संजय चव्हाण (वय १९ वर्षे, रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव) ३) एक विधीसंघर्ष बालक (बालअपचारी) असे त्यांनी सांगितले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे दुचाकीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अनिकेत चव्हाण याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने १५ दिवसांपूर्वी तासगावमधून ही ‘हिरो स्प्लेंडर’ मोटार सायकल तिघांनी मिळून चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्यांनी सावळज, विटा, पळशी आणि हिवरे या गावांमधून आणखी ४ मोटार सायकली चोरून त्या विकण्यासाठी एम एम पार्कच्या कमानीच्या आडोशाला लपवून ठेवल्याचे कबूल केले.

पोलिसांनी तातडीने क्राईम रेकॉर्ड तपासला असता या चोरीच्या गाड्यांबाबत तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष २,५०,०००/- रुपये किमतीच्या ५ काळ्या रंगाच्या ‘हिरो स्प्लेंडर’ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना आणि मुद्देमालाला तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, बालअपचाऱ्याला त्याच्या नातेवाईकांसह हजर करण्यात आले आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर, प्रकाश पाटील, अतुल माने, नागेश खरात, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, मोतीराम खोत, विक्रम खोत, महादेव नागणे, कॅप्टन गुंडवाडे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here