सांगलीत धडक कारवाई; कुख्यात ‘कोमल धुमाळ’ टोळी दोन वर्षांसाठी तडीपार

कोमल धुमाळ

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) |  आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी खाजगी सावकारी, खंडणी वसुली आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोमल रामचंद्र धुमाळ टोळीला सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.

 

सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सुतार प्लॉट, बाबर चाळ (पत्रकारनगर, कोल्हापूर रोड) येथे राहणारी टोळी प्रमुख कोमल रामचंद्र धुमाळ (वय ३०), अमित रामचंद्र धुमाळ (वय ३५) आणि वैशाली रामचंद्र धुमाळ (वय ५१) या तिघांच्या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२५ या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अवैधरित्या खाजगी सावकारी करून व्याजापोटी नागरिकांची अडवणूक करणे, हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणे, अपहरणाची धमकी देणे, तसेच बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांच्या सहाय्याने मारहाण करणे आणि जबरीने मालमत्ता হস্তगत करण्याचे प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्यामार्फत चौकशी पूर्ण करून अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सविस्तर सुनावणी घेऊन व सर्व कायदेशीर बाबी तपासून वरील तिन्ही आरोपींना सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली. आगामी काळातही गुन्हेगारी टोळीवर अंकुश ठेवण्यासाठी अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here