रेशनकार्ड ई-केवायसीच्या नावाखाली बनावट बँक खाती व सिमकार्डद्वारे ऑनलाइन फ्रॉड करणारी टोळी जेरबंद; नातेपुते पोलिसांची मोठी कारवाई

ई-केवायसी

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | रेशनकार्ड ई-केवायसीच्या (e-KYC) नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करत बनावट सिमकार्ड आणि बँक खाती (म्युल अकाउंट्स) उघडून ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या एका कुख्यात टोळीचा नातेपुते पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढे, मोहितेवाडी, फडतरी आणि लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांना “ई-केवायसी केली नाही तर सरकारी धान्य मिळणे बंद होईल,” अशी भीती दाखवून या टोळीने जाळ्यात ओढले. स्थानिक रेशन दुकानदार वर्धमान उर्फ लाला वसगडेकर याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत साथीदारांच्या मदतीने नागरिकांचे आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बायोमेट्रिक ठसे आणि चेहऱ्याचे ऑथेंटिकेशन गोळा केले. या confidential माहितीचा गैरवापर करून परस्पर मोबाईल सिमकार्ड आणि विविध बँकांचे म्युल अकाउंट्स उघडून याद्वारे मोठे ऑनलाइन आर्थिक फ्रॉड केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी नातेपुते पोलिसांनी कारवाई करत ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत: १. वर्धमान उर्फ लाला वसगडेकर (रा. नातेपुते) २. प्रशांत पांडुरंग साठे ३. हरिराम काशिनाथ जाधव ४. ऋषभ बाळासाहेब मोहिते ५. दत्ता शिंदे ६. दादा निंबाळकर

तपासादरम्यान वोडाफोन-आयडिया कंपनीचे सुमारे २५० बनावट सिमकार्ड निष्पन्न झाले असून, जिओ पे, एनएसडीएल पे, एअरटेल पे यांसारख्या ऑनलाइन अ‍ॅप्सचा वापर करून हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी आरोपींकडून ३ लॅपटॉप, ५ बायोमेट्रिक सिस्टीम, ७ मोबाईल फोन, १ जीपीएस मशीन, ३९ हजार रुपयांची रोकड आणि १० लाख रुपये किमतीची महिंद्रा एक्सयूव्ही ३०० (Mahindra XUV 300) कार असा एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत (IT Act) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, पंढरपूरच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल नवले आणि नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल कायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here