सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | अक्कलकोट बस स्थानकावर भाविकांची गर्दी साधून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या दोन महिला चोरांना सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल २ लाख २७ हजार २०० रुपये किमतीचे १५ ग्रॅम ४५० मिलि वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र हस्तगत केले असून, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकाला पंढरपूर व अक्कलकोट बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्यांचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, ९ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुंभारी टोलनाक्यावर गस्त घाजत असताना, अक्कलकोट बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असताना चोरी करणाऱ्या दोन महिला कुंभारी बस स्थानकावर थांबल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पथकाने तात्काळ धडक देत दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात अक्कलकोट बस स्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी १. चंद्रकला नितीन कांबळे (वय ३०, रा. लक्ष्मी माता मंदिर, लिंबेवाडी, सोलापूर) २. नंदा नागनाथ पाथरे (वय ६५, रा. लक्ष्मी माता मंदिर, लिंबेवाडी, कावळा गल्ली, सोलापूर) यांना अटक केली आहे.
तपासादरम्यान या महिलांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गु.र.नं. ४१८/२०२६ आणि ४४९/२०२६ असे दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी गेलेले १० ग्रॅम ४५० मिलि वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत १,५२,००० रुपये) आणि ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ७५,२०० रुपये) असा एकूण २ लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला आहे.
सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरीदास पांढरे, विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, पोलीस अंमलदार कपिल काटकर, योगेश जाधव, सुनील पवार, महिला पोलीस हवालदार दीपाली जाधव आणि सुनंदा झळके यांच्या पथकाने पार पाडली.







