सौर ऊर्जा प्लांट व नदीकाठच्या मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने उकलले कॉपर वायर चोरीचे ६ गुन्हे

केबल चोरी

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) |  सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातातील सौर ऊर्जा सोलर प्लांट आणि नदीकाठावरील इलेक्ट्रीक पंप व पाणबुडी मोटारींचे केबल वायर चोरणाऱ्या कुख्यात चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १४५ किलो ग्रॅम वजनाचे तांब्याचे वायर हस्तगत केले असून, १ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वैराग, माढा आणि टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील कॉपर वायर चोरीचे एकूण ६ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सोलर प्लांट आणि इलेक्ट्रीक मोटारींच्या कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात तपास करत असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रानमसले येथील समाधान नवनाथ पवार याने आपल्या साथीदारासह बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सोलर प्लांट तसेच माढा तालुक्यातील उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे आणि रांझणी येथून कॉपर वायरची चोरी केली आहे. चोरलेला माल विक्रीसाठी तो आपल्या घरासमोर थांबला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

पोलिसांनी संशयित आरोपी समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्या घरची झडती घेतली असता, त्याच्या घरात वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेले कॉपर वायर मिळून आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, रात्रीच्या वेळी सोलर प्लांट व नदीकाठच्या ठिकाणांहून केबल वायर चोरून आणल्यानंतर शेतातच ते वायर जाळून, त्यातील तांब्याचे तार वेगवेगळ्या पोत्यांमध्ये विक्रीसाठी लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली.

उघडकीस आलेले गुन्हे: आरोपीने दाखवलेल्या व अभिलेखात तपासलेल्या ठिकाणांनुसार खालीलप्रमाणे ६ गुन्हे निष्पन्न झाले आहेत: १. वैराग पोलीस ठाणे: गु.र.नं. २४८/२०२६, बीएनएस ३०३(२) २. माढा पोलीस ठाणे: गु.र.नं. १२५/२०२६, बीएनएस ३०३(२) ३. माढा पोलीस ठाणे: गु.र.नं. २११/२०२६, बीएनएस ३०३(२) ४. टेंभुर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. ११८/२०२६, बीएनएस ३०३(२) ५. टेंभुर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. १३९/२०२६, बीएनएस ३०३(२) ६. टेंभुर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. २०७/२०२६, बीएनएस ३०३(२)

सदर आरोपीस वैराग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here