जळगाव (संपादक सुनिल पाटील) | उत्सवाचा आनंद काही दिवसांचा असतो, मात्र त्यातून गावासाठी निर्माण झालेली सुविधा अनेक वर्षे समाजाच्या उपयोगी पडते. गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्याच निधीतून गावासाठी सुंदर बगीचा उभारण्याचा ‘GPS मित्र परिवाराचा’ निर्णय अत्यंत कौतुकास्पद आणि सामाजिक भान जपणारा आहे. दोन-चार दिवसांच्या रोषणाईपेक्षा त्याच खर्चातून गावासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण झाली, तर उत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक अधिष्ठान मिळते, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी खुर्द येथे बहिणाबाई मार्टजवळ आणि स्मशानभूमीच्या पुढील परिसरात उभारण्यात येणाऱ्या आकर्षक बगीच्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. पालकमंत्र्यांच्या सूचनेतून आणि युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या प्रस्तावित बगीच्यात पर्यावरणपूरक ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी फेरफटका मारण्याची व विरंगुळ्याची जागा, तसेच महिला व नागरिकांसाठी प्रसन्न आणि आरोग्यदायी वातावरणात वेळ घालविण्याची सुंदर सोय उपलब्ध होणार आहे. तसेच पाळधीकरांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी नियमित फवारणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी फॉगिंग मशीनही उपलब्ध करून दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी GPS मित्र परिवाराच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, “समाजात समस्या सांगणारे अनेक असतात, पण त्यावर उपाय उभा करणारे हात महत्त्वाचे असतात. जीपीएस परिवाराने पाणीप्रश्न, जलसंधारण, फिरती नेत्रसेवा, वारकरी सेवा आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देत ‘गरज ओळखा आणि कृती करा’ हा मंत्र प्रत्यक्षात आणला आहे.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते प्रतापराव पाटील यांनी उत्सवातील फाटा दिलेल्या खर्चातून गावासाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरणारी लोकोपयोगी मालमत्ता उभी करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. बगीचेची रचना व भविष्यातील उपयोगाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या भूमिपूजन सोहळ्यास उद्योगपती शरद कासट, सुनील झंवर, सिद्धिविनायक महागणपतीचे चेअरमन श्रीकांतजी मणियार, मुकुंद नन्नवरे, सरपंच विजू बापू, सरपंच शरद कोळी, दिनकर पाटील, दिलीप पाटील, अनिल कासट, श्रीकृष्ण साळुंखे, अलीम देशमुख, गोपाल सोनवणे, उपसरपंच अकबर खान, सावकार पठाण, सनवर सेठ, चंदू माळी, राजू भाट, संजय रामदास पाटील, आरिफ देशपांडे, हारून बागवान, नाना पाटील सर यांच्यासह GPS मित्र परिवाराचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण माळी यांनी केले, तर आभार प्रशांत झंवर यांनी मानले.







