कविवर्य ना. धों. महानोर साहित्य व शेती-पाणी पुरस्कार सोहळा संपन्न; मुंबईत साहित्य व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

कविवर्य ना. धों. महानोर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | कविवर्य ना. धों. महानोर यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणारा ‘कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ मुंबईत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात साहित्य व शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. याचप्रसंगी परिवर्तन जळगाव निर्मित संत कबीरांच्या विचारांचा शोध घेणाऱ्या ‘हंस अकेला’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

 

कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. श्रीकांत देशमुख, सुधींद्र कुलकर्णी, तसेच कविवर्य ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली, तर सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.

या सोहळ्यात साहित्य आणि शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात साहित्य क्षेत्रातील अविनाश उषा वसंत (मुंबई), श्रीकांत साव (चंद्रपूर), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, आणि विठ्ठल खिलारी (सातारा). शेती-पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील वैशाली पाटील (दसनूर, ता. रावेर, जि. जळगाव) आणि सीमा क्षीरसागर (कडवंची, ता. जालना) यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, वाचन आणि वैचारिक प्रगल्भतेचे महत्त्व अधोरेखित केले. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता निर्माण होण्यासाठी वाचन आवश्यक असून, ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राला त्याची गरज असते, असे त्यांनी सांगितले. तसेच जीवनातील संकटांवर मात करून इतर महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची चित्रफीत पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. डॉ. श्रीकांत देशमुख यांनी लेखक आणि संशोधकांनी आपल्या लेखनातून वर्तमान सामाजिक परिस्थितीचा वेध घेत ठोस सामाजिक भूमिका मांडली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

हंस अकेला’ सांस्कृतिक सादरीकरण

परिवर्तन जळगावच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘हंस अकेला’ या कार्यक्रमातून संत कबीरांचे जीवन, विचार आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. घुंगट के पट खोल रे’, भक्ती परंपरा, वारकरी परंपरा, नाथ परंपरा, संत नामदेवांचे पंढरपूर ते घुमान प्रवास, तसेच कबीरांचे विविध दोहे या सादरीकरणातून लोकांसमोर आणले गेले. गोविंद मोकाशी, पांडुरंग पाटील, श्रद्धा कुलकर्णी, वरुण नेवे, अंजली धुमाळ, रोहित बोरसे, यश महाजन, सुनीला भोलाने, अक्षय नेहे आणि हर्षल पाटील या कलाकारांनी सादरीकरण केले, तर शंभू पाटील यांनी विवेचन केले. साहित्य, शेती, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा हा संगम उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here