पारनेर (तालुका प्रतिनिधी अनिल नांगरे) | तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू असून, अनियमित वीजपुरवठा आणि अत्यंत कमी दाबामुळे (लो-व्होल्टेज) ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. दिवसभरात अनेक तास वीज गायब असतेच, पण जेव्हा वीज येते तेव्हा व्होल्टेज इतके कमी असते की घरातील साधे विजेचे उपकरणे नीट पेटत नाहीत. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावामध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. मात्र, सर्वात मोठी समस्या ‘लो-व्होल्टेज’ची आहे. वीज असली तरी दाब इतका कमी असतो की विजेवर चालणारी कोणतीही उपकरणे वापरता येत नाहीत. या सततच्या कमी-जास्त व्होल्टेजमुळे घरातील महागडे फ्रीज, टीव्ही, वॉटर पंप आणि स्टॅबिलायझर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांचे स्टॅबिलायझर जळून खाक झाले असून, दुरुस्तीचा मोठा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महावितरणच्या (MSEB) या ढिसाळ कारभारामुळे टाकळी ढोकेश्वरमधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महावितरणला कडक इशारा
“महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ वीजपुरवठा आणि व्होल्टेजची समस्या सुरळीत करावी. नागरिकांच्या जळलेल्या उपकरणांची जबाबदारी कोण घेणार? जर येत्या काही दिवसांत यावर ठोस कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा सज्जड इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी महावितरणचे अधिकारी झोपेतून जागे होऊन यावर तातडीने उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.







