
अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे) | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी राळेगणसिद्धी येथे दत्ता गाडगे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी आ. काशिनाथ दाते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही महाराष्ट्रासह देशातील मोठ्या पत्रकार संघटनांपैकी एक आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि हितासाठी संघटना सातत्याने काम करत असून, पत्रकारांच्या सुख-दुःखातही कायम सहभागी होत आली आहे. पारनेर तालुक्यात संघटनेने पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. दत्ता गाडगे यांच्यासारख्या अनुभवी व सक्रिय पत्रकाराची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी झालेली निवड ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.”आणि ही निवड निश्चितच सार्थकी लागेल.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दत्ता गाडगे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव तसेच सलग तीन वेळा पारनेरचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना दत्ता गाडगे यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष, संवादयात्रेचे यशस्वी आयोजन, कोरोना काळातील धाडसी पत्रकारिता, पत्रकार कल्याणा साठी विविध उपक्रम तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून त्यांनी संघटनेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना ‘उत्कृष्ट अध्यक्ष’ आणि ‘उत्कृष्ट संघटक’ या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पत्रकारितेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दत्ता गाडगे यांनी, “संघटनेच्या ध्येय-धोरणांना अनुसरून उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सचोटीने कार्य करेन,” असा विश्वास व्यक्त केला.दत्ता गाडगे यांच्या या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. सत्कार प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष उबाळे,सामाजिक कार्यकर्ते चौधरी, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पत्रकार गणेश जगदाळे, आणि सह अनेक मान्यवर उपस्थित होते.






