जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | एमआयडीसी परिसरातील कंपनीबाहेरून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील रहिवासी मनोज शंकरराव गरुड यांचा मुलगा प्रथम गरुड याने आपली सीबी शाईन मोटारसायकल (क्र. MH-19 DD 8323) १४ ऑगस्ट रोजी सकाळी एमआयडीसी परिसरातील ‘व्ही. सेक्टर लिड्स इंडस्ट्रीज’ या कंपनीसमोर पार्क केली होती. सायंकाळी काम संपवून परत आल्यावर दुचाकी जागेवर न दिसल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील व सहकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपास चक्र फिरवत संशयित आरोपी मोहम्मद शहा अस्लम शहा याला भुसावळ येथून शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची सीबी शाईन, एमआयडीसी पोलीस ठाण्यात आधी दाखल असलेल्या गुन्ह्यातील विना क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर तसेच ५० हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची बजाज सीटी १०० अशा एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. विशाल कोळी आणि योगेश घुगे यांनी केली.







