जळगावच्या इस्लामपुरा परिसरात शनिपेठ पोलिसांचा छापा; ५५ किलो गोमांसासह १९,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शनिपेठ पोलिसांचा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक आणि प्रतिबंधित गोमांस विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील इस्लामपुरा परिसरात असलेल्या मदिना मशिदीजवळ छापा टाकून पोलिसांनी ५५ किलो प्रतिबंधित गोमांस व विक्रीच्या साहित्यासह एकूण १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय यंत्रणा सतर्क करून प्रतिबंधित गोमांस विक्री व वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी इस्लामपुरा परिसरातील मदिना मशिदीजवळ प्रतिबंधित गोमांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.शनिपेठ पोलिसांचा

या कारवाईत मदिना मशिदीजवळ गोमांस विक्री करताना कुरेशी सज्जाद खान युसुफ (वय २४, रा. घर नं. २१, इस्लामपुरा, जळगाव) हा तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ११ हजार रुपये किमतीचे ५५ किलो गोमांस, १,१०० रुपयांचा एक जुना फ्रिज, ३ हजार रुपयांचे मोठे ॲल्युमिनियमचे पातेले, १,५०० रुपयांचे चार स्टीलचे हंडे, चार लोखंडी सुरे, कुऱ्हाड, दोन वजनकाटे, विविध वजनाची मापे व तीन मस्कुला असा एकूण १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भागवत विकास हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, संतोष खेडेकर, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, शशिकांत पाटील, रवींद्र इंधाटे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश घुगे, नवजित चौधरी व सतीश भारुळे यांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here