जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची मुंबईत आढावा बैठक संपन्न; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे रणनीती आखण्याचे आदेश

काँग्रेस

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय ‘टिळक भवन’, मुंबई येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला, तसेच जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

बैठकीत जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष (पूर्व व पश्चिम विभाग) यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. येत्या १५ दिवसांच्या आत दोन्ही विभागांच्या प्रमुखांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा दौरा करावा आणि सर्व घटकांना न्याय देणारी, पक्षाची ताकद वाढवणारी ‘सर्वसमावेशक’ जिल्हा कार्यकारिणी तयार करावी, असे आदेश देण्यात आले. ही कार्यकारिणी प्रदेश काँग्रेसच्या अंतिम मान्यतेने लवकरच अधिकृतपणे घोषित केली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील पक्ष संघटनेला थेट बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब स्वतः लवकरच संघटनात्मक जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजना संदर्भात आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर या बैठकीत वरिष्ठ नेत्यांमध्ये सखोल मंथन झाले.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैय्या पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, तसेच प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भालेराव, पूर्व जळगावचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, नितीन सूर्यवंशी, ॲडव्होकेट अंकुश कटारे आणि नगरसेवक अहमद कुरेशी आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत या बैठकीवरून मिळत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here