“रहे ना रहे हम” गाणारा स्वर अजरामर राहणार; ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना ‘परिवर्तन’ संस्थेतर्फे भावपूर्ण स्वरांजली

सुमन कल्याणपूर

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | भारतीय संगीत विश्वातील सुप्रसिद्ध आणि दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानिमित्त जळगाव येथील प्रसिद्ध ‘परिवर्तन’ संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात आली. आपल्या अवीट गाण्यांच्या माध्यमातून सुमनताईंच्या समृद्ध संगीत वारशाला उजाळा देणारा हा विशेष कार्यक्रम स्थानिक रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अत्यंत भावूक वातावरणात संपन्न झाला.

 

या श्रद्धांजली सभेला निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे, सानिया ढिवरे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, मालन चव्हाण, अनिश शहा आणि अनिल कांकरिया आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून दिवंगत सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत मोजकीच; परंतु संगीत इतिहासात अजरामर ठरलेली अनेक गीते गायली आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सुमनताईंची लोकप्रिय गाणी ‘देव माझा विठू सावळा’, ‘केशवा माधवा’, ‘सावळ्या विठ्ठला’ ही भक्तीगीते, ‘जिथे सागरा’, ‘रिमझिम झरती’, ‘अरे संसार संसार’, ‘केतकीच्या बनी’ ही मराठी गीते, तसेच ‘इतना है तुमसे प्यार हमें’, ‘जान चली जाये’, ‘दुनिया बनाने वाले’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘ना तुम हमें जानो’ आणि ‘रहे ना रहे हम’ कोणत्याही वाद्यसाथीशिवाय सादर करण्यात आली.या सुरांनी उपस्थित रसिकांना जुन्या सुरेल आठवणींच्या विश्वात रमवले.

गायिका श्रद्धा कुलकर्णी आणि अंजली धुमाळ यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणातून सुमनताईंच्या सुरांना जिवंत केले. तर प्रसिद्ध निवेदक शंभू पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सुमन कल्याणपूर यांच्या एकूणच संगीत प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सुमनताईंच्या कारकिर्दीतील अनेक अविस्मरणीय आठवणी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील पडद्यामागचे किस्से आणि प्रसंग रसिकांसमोर उलगडले. भारतीय संगीतविश्वात सुमनताईंचे स्थान नेहमीच अढळ आणि अजरामर राहील, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना गोविंद मोकाशी यांची होती. कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्ता सरकार आणि मंजुषा भिडे यांनी उत्तमरीत्या सांभाळली, तर निर्मिती प्रमुख म्हणून नारायण बाविस्कर आणि भूषण गुरव यांनी काम पाहिले.

सदर कार्यक्रमासाठी गणपती नगर येथील रोटरी क्लब तसेच प्रेमभाई कोगटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल निंबाळकर, अक्षय नेहे, जय सोनार आणि गणेश सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here