कल्याण (संपादक सुनिल पाटील) | महाराष्ट्र राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजना’ अंतर्गत, ठाणे जिल्हा मानधन समितीवर कार्यकारीणी मंडळ सदस्य म्हणून बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आणि अनुभवाचा विचार करून तसेच बालरंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मानधनाशी संबंधित प्रक्रियेत अधिक गती येण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना शिवाजी शिंदे यांनी शासनाचे आभार मानले असून, वृद्ध कलावंतांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.







