मुंबई (संपादक सुनिल पाटील) | आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण प्रसंगात त्यांना आधार देण्यासाठी ‘श्री श्री बालाजी’ संस्थेच्या संचालिका तथा बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांनी आज माने कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
कै. सचिन माने यांच्या कुटुंबाला संकटातून सावरण्यासाठी या संस्थेमार्फत तात्काळ मदतीचा ओघ सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ‘श्री श्री बालाजी’ संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
केवळ आर्थिक मदत देऊन न थांबता, ॲड. निलम शिर्के सामंत यांनी माणुसकीचे दर्शन घडवत, कै. सचिन माने यांच्या पत्नीला नोकरी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. “माने कुटुंब या दुःखाच्या काळात एकटे नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे आणि मदतीच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे व बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.







