महावितरणचा ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’चा जाच; ग्रामीण भागाला सापत्न वागणूक का?

इमर्जन्सी लोडशेडिंग

शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचा संताप; महावितरणला तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | सध्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या पेरणीचा हंगाम आणि वाढता बिबट्याचा उपद्रव लक्षात घेता, महावितरण कंपनीकडून होत असलेले अघोषित ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ ग्रामीण जनतेच्या जीवावर उठले आहे. रात्री-बेरात्री होणाऱ्या वीज कपातीमुळे ग्रामीण भागातील नागरिक अंधारात जीवन जगत असून, या विरोधात आता संतप्त लोकआक्रोश उसळला आहे.

 

शहरांमधील वीजपुरवठा २४ तास तेजाने झळकत असताना, ग्रामीण भागात मात्र मनमानी पद्धतीने वीज कापली जात आहे. रात्री बारा-बारा वाजेपर्यंत वीज नसल्याने शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. ग्रामीण जनता भारतीय नागरिक नाही का? असा खडा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सध्या अनेक भागांत बिबट्यांचा वावर वाढला आहे. अशा स्थितीत रात्रीची वीज खंडित करणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या कामासाठी रात्रीची वीज गरजेची असते, मात्र महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान होत आहे.

महावितरणकडून वीज बिल वेळेवर भरण्यासाठी सक्ती केली जाते आणि बिल भरले नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कापण्याचा इशारा दिला जातो. मात्र, स्वतः वीजपुरवठा करताना ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’चा बागुलबुवा उभा करून जनतेला वेठीस धरले जात आहे. ग्रामीण भाग हा महाराष्ट्राचा कणा आहे, मात्र याच कण्याला महावितरणकडून दुर्लक्षित करून कमकुवत केले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

समान वीजपुरवठा हा आमचा अधिकार असून, तो कोणाची मेहेरबानी नाही, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे (खामखेडा), सरपंच ॲड. वैभव प्रवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनंजय बोरसे (सावकी), तसेच योगेश निकम, दिपक पवार, योगेश पवार, रविंद्र शेवाळे आणि कैलास कोकरे आदींनी महावितरणला इशारा दिला आहे. ग्रामीण भागाला मिळणारी सापत्न वागणूक तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि त्यास सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here