नाशिक (विशेष प्रतिनिधी) | “पत्रकार म्हणजे विकाऊ किंवा दलाल, असा शिक्का मारण्याचा अधिकार सत्ताधारी आणि गावपुढाऱ्यांना कोणी दिला?” असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक तथा पत्रकार कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे. समाजमाध्यमांवरील वाढत्या ट्रोलिंगवर आणि लोकशाहीच्या ढासळत्या स्थितीवर त्यांनी आपल्या धारदार लेखणीतून भाष्य केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या उक्तीचा संदर्भ देत जाधव यांनी म्हटले आहे की, एक पत्रकार म्हणून चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हेच आमचे कर्तव्य आहे. मात्र, जेव्हा पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा त्याला ‘विकाऊ’ किंवा ‘दलाल’ म्हणून हिणवले जाते. स्वतःच्या सोयीची बातमी हवी असणाऱ्या नेत्यांकडून पत्रकारांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या दारापर्यंत चकरा मारणारे नेते निवडून आल्यावर मात्र मतदारसंघापासून लांब आपले इमले बांधतात, अशी टीका त्यांनी केली आहे. दोन-तीन पंचवार्षिक उलटूनही साधी आढावा बैठक न घेणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या हक्काचा निधी कार्यकर्त्यांसोबत वाटून खात आहेत. शेतकरी, मध्यमवर्गीय आणि सामान्य जनता सध्या सर्वाधिक त्रस्त असताना, नेत्यांना मात्र फक्त गर्भश्रीमंत वर्गाची आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या कमिशनचीच चिंता आहे.
पावसाची पाठ, नाफेडचा फुसका बार आणि हमीभावाच्या केवळ कागदी घोषणांमुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ आज प्रभावीपणे काम करत नसल्याची खंत व्यक्त करत, त्यांनी ‘विधिमंडळ’ निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांना उद्देशून जाधव यांनी आवाहन केले आहे की, बदनामीला घाबरून न जाता आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. जनतेनेही आता भ्रष्ट नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता, तुकाराम मुंढेंसारख्या कर्तव्यदक्ष आणि जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला शोधले पाहिजे.
येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रामाणिक आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन बघा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जर ते कामात यशस्वी ठरले तर त्यांना पुन्हा साथ द्या, अन्यथा त्यांनाही घरी बसवण्याची ताकद जनसामान्यांनी दाखवावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.







