देवळ्यात ‘कुंपणानेच शेत खाल्ले’; वसाका कारखान्यात लाखो रुपयांच्या मुद्देमालासह ४ सुरक्षा रक्षक रंगेहाथ जेरबंद

वसाका

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील ‘वसाका’ (वसंतदादा सहकारी साखर कारखाना) कारखान्यातून दिवसाढवळ्या लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरताना कारखान्याच्याच चार सुरक्षा रक्षकांना स्थानिक तरुणांनी रंगेहाथ पकडले. कारखान्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनीच दरोडा टाकल्याने संपूर्ण देवळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवळा पोलिसांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता. ३) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कारखान्याच्या आवारात एक मारुती ८०० चारचाकी गाडी (क्र. MH 15 F 6161) संशयास्पदरीत्या फिरताना स्थानिक तरुणांना दिसली. तरुणांनी शंका आल्याने या वाहनाचा पाठलाग केला आणि वसाका-लोहोणेर रस्त्यावर गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता, त्यात कारखान्यातून चोरलेली लाखो रुपये किमतीची तांब्याची तार आणि मिलमधील सुमारे १०० ते १५० किलो वजनाची मोठी पितळी प्लेट, असा एकूण ३ ते ४ लाख रुपये किमतीचा माल आढळून आला. तरुणांनी कसून चौकशी केली असता, सुरक्षा रक्षकांनी हा माल कारखान्यातूनच चोरल्याची कबुली दिली.

चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वसाका कार्यस्थळावर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चारही चोरट्यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेतले.

वसाका

अटक करण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये: १. हितेंद्र गंगाधर भामरे (रा. ठेंगोडा) २. शरद तानाजी गरुड (रा. भऊर) ३. शरद वामन गरुड (रा. भऊर) ४. भाऊसाहेब दिलीप गांगुर्डे (रा. महालपाटणे) यांचा समावेश आहे. याप्रकरणी कारखान्याचे सुरक्षा पर्यवेक्षक कैलास पुंडलिक गरुड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, सुरेश कोरडे आणि दिलीप सोनवणे पुढील तपास करत आहेत.

वसाका कारखान्यात यापूर्वीही चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र यावेळी थेट सुरक्षा रक्षकच चोर निघाल्याने ‘कुंपणानेच शेत खाल्ल्याची’ भावना निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत हा कारखाना शिखर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) आणि अवसायक (Liquidator) देवळा यांच्या ताब्यात आहे. कारखान्याची तब्बल ४०० कोटी रुपयांची मालमत्ता प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांनी केला आहे.

कारखान्याच्या पश्चिम बाजूची संरक्षण भिंत पाडून तेथील दोन एकर जागेवर शेतीसाठी नांगरणी करण्यात आली असूनही बँक किंवा अवसायकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दिवसाढवळ्या कारखान्यातील तांबे, पितळ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला जात असल्याने, आता या मालमत्तेचे रक्षण कसे करायचे, असा संतप्त प्रश्न स्थानिक नेते कुबेर जाधव व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

वसाका

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here