महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील घोटाळा विधानसभेत गाजला

महात्मा ज्योतिबा फुले

आमदार डॉ. राहुल आहेर यांची दोषींवर आर्थिक गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक (उपसंपादक मिलिंद पवार) | महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी विधानसभेत उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या या संशयास्पद व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सभागृहात लावून धरली.

 

विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना डॉ. राहुल आहेर यांनी एक धक्कादायक आकडेवारी सभागृहासमोर ठेवली. सन २०२४ ते २०२६ दरम्यान हा प्रकार घडला. तब्बल १६ हजार रुग्णांची नोंदणी एकाच मोबाईल क्रमांकावरून करण्यात आली. या १६ हजार प्रकरणांपैकी तब्बल ९,५०० प्रकरणे एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिकमधील ९,५०० दाव्यांपैकी सुमारे ८,५०० दावे हे फक्त ५ संशयास्पद रुग्णालयांमध्ये झाले आहेत.

आमदार आहेर यांनी आरोप केला की, अस्तित्वात नसलेल्या किंवा प्रत्यक्ष उपचार न घेतलेल्या रुग्णांच्या नावावर खोट्या शस्त्रक्रिया दाखवून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक दावे उचलण्यात आले आहेत.

“पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?” “या प्रकरणाच्या चौकशीसाठी जेव्हा वरिष्ठ अधिकारी नाशिकला भेट देऊन गेले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी संबंधित पोर्टल अचानक बंद पडले. माहिती उपलब्ध न झाल्याने हा पुरावे नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तर नाही ना?” असा संशयही डॉ. आहेर यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण महाघोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावी. केवळ रुग्णालयेच नव्हे, तर या गैरव्यवहारात सहभागी असलेले आरोग्य मित्र, दलाल, अधिकारी आणि संबंधित सर्व घटकांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. अपहार करण्यात आलेला शासनाचा संपूर्ण निधी संबंधित दोषींकडून वसूल करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावर तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलवावी.

आमदार आहेर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी शासनाची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या प्राथमिक तपासात १ जुलै २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १५,४०७ संशयास्पद प्रकरणे आढळली आहेत.

नाशिकमधील संबंधित दोषी रुग्णालयांवर आधीच एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून, त्यांची जनआरोग्य योजनेतील मान्यता रद्द करण्यात आली आहे. केवळ रुग्णालयांवरच नाही, तर या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आरोग्य मित्रांवर, संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दलालांवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तातडीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here