सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | खटाव तालुक्यातील गणेशवाडी (वडूज) परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले होते. घरांमध्ये घुसून अन्नधान्याची नासधूस करणे, शेतातील पिकांचे नुकसान करणे तसेच लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.
या तक्रारींची दखल घेत वन विभागाचे अधिकारी नितीन आटपाडकर, सुहास काळे व अनिल देशमुख यांनी आज दि.१ जुलै रोजी गणेशवाडी येथे वनविभागाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून माकडांना सुरक्षितरीत्या पकडण्याची कारवाई केली. या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, माकडांच्या वाढत्या त्रासापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे सांगितले. वनविभागाने नागरिकांना माकडांना खाद्यपदार्थ देऊ नयेत, त्यांना चिथावणी देणारे किंवा त्रासदायक कृत्य करू नये तसेच माकडांचा उपद्रव आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. अशा तक्रारींवर कारवाईसाठी वनविभागाने मार्गदर्शक कार्यपद्धतीही लागू केली आहे.
गणेशवाडीतील या कारवाई मधे माजी सरपंच अंकुश राऊत, रमेश शिंगाडे, सचिन साळुंखे, नेताजी साळुंखे, सोमनाथ घाडगे, नानासो कोळेकर, तुषार राऊत, निलेश कोळेकर, गोरख काळे, नानासो वाघमोडे, महादेव गोरड, मनोज सुतार व ग्रामस्थांनी सहकार्य केले तसेच वनविभागाचे आभार मानत, परिसरात नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे.






