सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा पाय घसरून ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्यामुळे तब्बल ७ तास जागेवरच पडून राहिलेल्या या विद्यार्थिनीला सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. मुलीचे वजन ९० किलो असल्यामुळे काही ठिकाणी स्ट्रेचरचा वापर करणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत जवानांनी तिला खांद्यावर उचलून खाली आणले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीची तयारी करणारे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज सकाळी ६ च्या सुमारास त्यांचे प्रशिक्षक स्वप्नील गंगड सर यांच्यासोबत सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग दरम्यान या गटातील एक विद्यार्थिनी थकल्यामुळे मागे राहिली. सर्वजण गडावरून खाली उतरत असताना ती पुणे दरवाज्याजवळ उभी असल्याचे काही जणांनी पाहिले होते. मात्र, पाठीमागून येत असताना सिंहगडाच्या मध्यभागी ट्रेकिंग मार्गावर अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच फ्रॅक्चर झाले. प्रचंड वेदनेमुळे ती जागेवरून हलूही शकत नव्हती आणि दुपारचे दीड वाजेपर्यंत ती त्याच ठिकाणी मदतीशिवाय पडून होती.
इतर सर्व विद्यार्थी खाली उतरले तरीही ती मुलगी न आल्याने प्रशिक्षक स्वप्नील गंगड सर तिची वाट पाहत होते. त्यांनी गडावरील पर्यटकांकडेही विचारपूस केली, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. सुरुवातीला ती पुढे निघून गेली असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, सर्व गट खडकवासला डॅम चौपाटी येथे पोहोचल्यानंतर तिच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा ती घरी पोहोचलीच नसल्याचे समोर आले आणि सर्वांचेच धाबे दणाणले.
मुलगी बेपत्ता असल्याची माहिती खडकवासला येथे कर्तव्यावर असलेले बहादूर सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वऱ्हाड यांनी वेळ न गमावता तात्काळ ‘हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागा’चे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली.
माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने सिंहगडाच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांनी शोधमोहीम राबवली. अखेर गडाच्या मध्यभागी ती विद्यार्थिनी अत्यंत गंभीर आणि वेदनेने विव्हळत असलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचा पाय मोडल्यामुळे तिला चालणे अशक्य होते. बचाव पथकाने तिला स्ट्रेचरवर झोपवून खाली आणण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीचे वजन ९० किलोच्या आसपास असल्याने अनेक तीव्र उताराच्या आणि अरुंद ठिकाणी स्ट्रेचर नेणे अशक्य झाले होते. अशा वेळी जवानांनी आणि सुरक्षा रक्षकांनी जीवाची पर्वा न करता तिला स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतले आणि सुरक्षितपणे गडाखाली आणले. तिथून तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“माणुसकी अजून जिवंत आहे… वेळ आली तर जीव धोक्यात घालूनही मदतीला धावणारे हात अजून समाजात आहेत.” या संपूर्ण मोहिमेत विशेष कौतुक होत आहे ते सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांचे. त्यांची ड्युटी संपली असतानाही, त्यांनी घरी न जाता केवळ मानवतेच्या भावनेतून सिंहगडाकडे धाव घेतली आणि थेट बचावकार्यात उडी घेतली. हरिदास वऱ्हाड यांनी यापूर्वीही अनेक पर्यटकांचे जीव वाचवून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. वेळेवर मिळालेली मदत, सुरक्षा रक्षकांची तत्परता आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अचूक नियोजनामुळे आज एका विद्यार्थिनीचे प्राण वाचले असून, सर्व स्तरांतून या शूरवीरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






