खडकवासला धरणावरील जीवदान कार्याचा गौरव; सुरक्षारक्षक हरिदास वऱ्हाड यांचा विशेष सत्कार

खडकवासला

माजी महापौर दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते सन्मान; पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | खडकवासला धरण परिसरात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक नागरिकांचे प्राण वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणारे सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांचा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. खडकवासला धरण कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात वऱ्हाड यांच्या धाडसी व निस्वार्थ सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यानंतर परंपरेनुसार जलपूजनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी महापौर तथा माजी आमदार दीप्तीताई चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह लघुअण्णा निवांगुणे (अध्यक्ष, पुणे जिल्हा इंदिरा काँग्रेस), सुरेश मते (ज्येष्ठ नेते व अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ काँग्रेस), प्रशांत नानगुडे पाटील (माजी सरपंच), अवधूत दादा मते (काँग्रेस नेते), संदीप भाऊ मते (उद्योजक, मुकाई उद्योग समूह), सिताराम मते (माजी सैनिक) या मान्यवरांनी सोहळ्याला हजेरी लावली
हरिदास वऱ्हाड यांनी खडकवासला धरण परिसरात अनेक वेळा खोल पाण्यात आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेणाऱ्या नागरिकांना वेळेत सुखरूप बाहेर काढून नवजीवन दिले आहे. केवळ प्राण वाचवणेच नव्हे, तर निराश होऊन आलेल्या अशा अनेक नागरिकांचे प्रभावी समुपदेशन करून त्यांनी त्यांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्यास प्रवृत्त केले आहे.
धरण परिसराव्यतिरिक्त रस्ते अपघात, आपत्तीजन्य परिस्थिती तसेच विविध गड-किल्ल्यांवरील बचाव मोहिमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. रात्रीच्या वेळी किंवा अंधारामध्ये अडकलेल्या तरुणींना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले आहे.

‘हरिदास वऱ्हाड यांचे कार्य प्रेरणादायी’ — दीप्तीताई चौधरी
“समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या अशा खऱ्या हिरोंचा योग्य सन्मान होणे ही समाजाची जबाबदारी आहे. हरिदास वऱ्हाड यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, आजच्या युवकांनी त्यांच्याकडून सेवा, धैर्य आणि मानवतेचे मूल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी योगदान दिल्यास समाजात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडू शकते.”
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदान केलेल्या अभिनंदनपत्रात हरिदास वऱ्हाड यांच्या धाडसी, निःस्वार्थ आणि मानवतावादी कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले असून त्यांच्या पुढील समाजसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. आज विविध सामाजिक संस्था, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय नेते वऱ्हाड यांच्या कार्याची दखल घेत असून, त्यांच्या या सेवाभावामुळे समाजात धैर्य आणि मानवतेचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here