फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

विजेचा धक्का

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) |  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोरील विद्युत केबलमध्ये अचानक उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा (करंट) जोरदार धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास शिंदे कुटुंबातील सदस्य पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६), आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) नेहमीप्रमाणे घराबाहेर आले होते. त्याच वेळी घरासमोरील विद्युत केबलमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला. या प्रवाहाचा पहिला जोरदार धक्का पिसुरड्या किसन शिंदे यांना बसला. त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील गंगुबाई, सचिन आणि आरती हे तिघेही तातडीने पुढे सरसावले. मात्र, विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, एकामागून एक तिघेही त्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

विद्युत केबलमध्ये अचानक करंट कसा उतरला आणि या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here