माण-खटाव तालुक्यातील रस्त्याकडील धोकादायक विहिरींना तातडीने सुरक्षित करा; प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांचे आदेश

माण-खटाव

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | माण आणि खटाव तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक व उघड्या विहिरींचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. तडवळे (ता. खटाव) येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सयाजी फाळके यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिलेल्या लेखी निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. माण उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) उज्वला गाडेकर यांनी तातडीने याप्रकरणी संबंधित विभागाला नोटीस बजावून तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील तांदुळवाडीमध्ये रस्त्यालगतच्या विहिरीत पिकअप वाहन कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या भीषण अपघाताची पार्श्वभूमी लक्षात घेऊन दत्तात्रय फाळके यांनी खटाव तालुक्यातील तडवळे येथील धोकादायक विहिरींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी दाद मागितली होती.

तडवळे गावातील घाडगे ओटा ते तडवळे ओढ्या जवळील रस्त्यालगत एक जुनी व उघडी विहीर आहे. या विहिरीभोवती कोणतेही मजबूत संरक्षणात्मक कठडे, जाळी किंवा सुरक्षा व्यवस्था नाही. नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात विहिरीला पत्रे आडवे लावले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पादचारी, दुचाकीस्वार आणि जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो. भविष्यात येथे माळशिरससारखी दुर्घटना घडू नये, यासाठी ही विहीर बुजवावी किंवा त्याभोवती संरक्षण भिंत व लोखंडी जाळी उभारावी, अशी मागणी फाळके यांनी केली होती.

या निवेदनावर प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी तातडीने प्रशासकीय पावले उचलत संबंधित विभागाला खालील मुद्द्यांनुसार कडक कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत:

१. सर्व्हेक्षण व यादी तयार करणे: संबंधित विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मुख्य रस्ते, ग्रामीण रस्ते आणि ओढ्या-नाल्यांलगत असलेल्या धोकादायक व उघड्या विहिरींचा तात्काळ शोध घेऊन त्यांची यादी तयार करावी. २. संरक्षक कठडे बांधणे: ज्या रस्त्यालगत अशा विहिरी आढळतील, तिथे संबंधित विभागाने त्वरित संरक्षक कठडे बांधण्याची कार्यवाही करावी. ३. धोकादर्शक फलक लावणे: सर्व संवेदनशील व अपघातप्रवण विहिरींच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना दुरुनच दिसेल असे ‘धोकादायक विहीर’ किंवा ‘सावधान’ दर्शवणारे फलक लावण्यात यावेत. ४. खाजगी विहीर मालकांना सूचना: खाजगी क्षेत्रातील अशा विहीर मालकांना त्यांच्या विहिरी सुरक्षित ठेवण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून कडक सूचना देण्यात याव्यात. ५. प्रगती अहवाल सादर करणे: संपूर्ण खटाव व माण तालुक्यासाठी तात्काळ मोहीम हाती घेऊन केलेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

“प्रशासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही न केल्यास आणि भविष्यात कोणतीही अपघातप्रवण घटना घडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार धरण्यात येईल,” अशी कडक ताकीद प्रांताधिकारी गाडेकर यांनी नोटिसीद्वारे दिली आहे.

युवा नेते दत्तात्रय फाळके यांनी तडवळे गावातील विहिरीचा मर्यादित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला होता. मात्र, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी याचे गांभीर्य ओळखून हा विषय केवळ एका गावापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण माण आणि खटाव तालुक्यासाठी लागू केला. दोन्ही तालुक्यांतील संबंधित विभागांकडून तात्काळ अहवाल मागवून त्यांनी घेतलेल्या या धडक निर्णयामुळे नागरिकांमधून व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

फोटो ओळी: तडवळे गावचे युवा नेते दत्तात्रय फाळके सातारा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देताना. (दुसऱ्या छायाचित्रात) प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी संबंधित विभागाला काढलेली कडक नोटीस.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here