सातारा पोलिसांची मोठी कारवाई : तोतया सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून बँकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

सातारा

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | हॉलमार्क असलेल्या बनावट पिवळ्या धातूच्या (सोन्यासारख्या दिसणाऱ्या) बांगड्या खऱ्या असल्याचे भासवून सराफ व्यावसायिक तसेच फायनान्स बँकांची तब्बल १० लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा सातारा शहर डी.बी. पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी परजिल्ह्यातून ३ सराईत आरोपींना अटक केली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यातील २ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ३ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.

बनावट सोने तारण ठेवून बँकांना गंडा घातल्याप्रकरणी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण (D.B.) पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी डी.बी. पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा प्रभावी वापर केला. गुम्हा घडल्यापासून फरार असलेल्या आरोपींचा माग काढत पोलिसांनी अत्यंत जलद गतीने कारवाई करत ३ आरोपींना अटक केली आणि त्यांनी तारण ठेवलेल्या बनावट बांगड्या जप्त केल्या.

या प्रकरणी  उमेश शशिकांत शिंदे (वय ४० वर्षे, मूळ रा. कोरेगाव, जि. सातारा; सध्या रा. चिंतामणी सोसायटी, मुंबई),  सोमनाथ भुजंगराव बाबर (वय ३९ वर्षे, सध्या रा. देगाव रोड, सातारा; मूळ रा. साबळेवाडी, जि. सातारा),  सिकंदर बादशहा शेख (वय ४८ वर्षे, रा. शांतीनगर पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध सातारा शहर पोलिसांचे डी.बी. पथक घेत आहे.

या मोठ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सर्व बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि सराफ व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोने तारण ठेवताना किंवा खरेदी-विक्री करताना केवळ हॉलमार्कवर विसंबून न राहता, अधिकृत यंत्रणेमार्फत आणि तज्ज्ञांकडून दागिन्यांची घासून व पूर्ण पडताळणी करूनच खात्री करावी. सत्यता पटल्याशिवाय कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस अंमलदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मछिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम, सचिन आदमाने तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here