पुणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरला आहे. शहरातील पूरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे.
शहरातील रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी आणि भोसरीतील कुंदननगर यांसारख्या सुमारे २० ते २५ पूरग्रस्त भागांमध्ये नागरिक अडकले होते. तेथे अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे १,५०० नागरिकांची सुखरूप सुटका केली.
चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये पूर आल्याने अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे जवानांनी यशस्वी बचावकार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविले. जुनी सांगवी परिसरात पूराच्या पाण्यात अडकलेल्या एका माऊलीची आणि तिच्या लहान बाळाची जवानांनी अत्यंत धाडसीपणे सुखरूप सुटका केली. काळेवाडी व ताथवडे परिसरात पूरपाण्यात अडकलेल्या गर्भवती महिला, लहान मुले आणि अनेक वयोवृद्ध नागरिकांना जवानांनी सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात पोहोचविले. तसेच नदीकाठच्या मंदिरांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली.
पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या एकूण ५,००० नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये (Shelter Homes) स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे पूरग्रस्तांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय व आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांसोबतच पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे ७५० मुक्या जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी उत्तम समन्वय ठेवून ही आपत्कालीन परिस्थिती हाताळली. या संपूर्ण बचाव मोहिमेत:
उपअग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमैन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे आणि ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर यांनी जिवाची बाजी लावून उल्लेखनीय कामगिरी बजावली.
तसेच नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल्स स्वीकारणे आणि बचाव पथकांशी सतत संपर्क ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली.
सध्या देखील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये अग्निशमन विभागाचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी २४x७ सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.







