पुणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर रोहन सोनाळे) | वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आज देहूनगरीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या तालावर लाखो भाविक व वारकऱ्यांच्या साक्षीने श्रींच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने आपले मंगल प्रस्थान केले. संपूर्ण देहूनगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती.
या ऐतिहासिक आणि भक्तीरसाने न्हाऊन निघालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, श्रीरंग आप्पा बारणे (खासदार), सुनील अण्णा शेळके (आमदार), महेशदादा लांडगे (आमदार), विलास लांडे पाटील (माजी आमदार), सुनील हगवणे (पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख) यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. या सर्व मान्यवरांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला आणि विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
पालखी प्रस्थान सोहळा परंपरेनुसार आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जालिंदर महाराज मोरे (अध्यक्ष, देहू संस्थान), विक्रमसिंह महाराज मोरे (पालखी सोहळा प्रमुख), गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे (विश्वस्त, देहू संस्थान) आदी देहू संस्थानचे पदाधिकारी व सोहळा प्रमुख उपस्थित होते.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या तुकोबारायांच्या पालखीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊल्या, हाती भगव्या पताका घेतलेले वारकरी आणि विठूनामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. प्रस्थान सोहळा संपन्न झाल्यानंतर पालखीने पंढरपूर मार्गावर आगेकूच केली आहे.







