पुणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर रोहन सोनाळे) | केंद्र शासनाच्या ‘उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा विशेष जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथाचे भव्य उद्घाटन महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतदादा पाटील विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाले. हा चित्ररथ आकुर्डी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचा संदेश पोहोचविणार असून, शिक्षण विभागाचे १० कर्मचारी संपूर्ण वारीत सहभागी होऊन हे साक्षरता अभियान राबविणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा एक पवित्र आणि अभिनव उपक्रम आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व आणि निरक्षरता निर्मूलनाचा संदेश वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.”
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी मिळाली पाहिजे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहर शंभर टक्के साक्षर करण्यासाठी महापालिकेचा ‘अक्षर विश्व’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिकेच्या १३५ शाळांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ ही शिक्षण विभागाची अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक भान जपणारी संकल्पना आहे. दहा शिक्षकांची टीम पालखी सोहळ्यात सहभागी होऊन निरक्षरतेविरुद्ध जनजागृतीचे मोठे कार्य करणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता आभार (बांगर), विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील, उपसंचालक वंदना वावळ, गणपत मोरे, सहाय्यक संचालक सतीश चौधरी, शिक्षण उपनिरीक्षक रमेश चव्हाण तसेच शिक्षण विभागाचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







