पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या – गर्दीचा फायदा घेऊन दागिने लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत एक मोठी आणि धडाकेबाज कामगिरी केली आहे. बस स्थानक आणि लग्नकार्यातील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा १००% मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरी आणि घरफोडीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले असून एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

बस प्रवासादरम्यान मंगळसूत्र चोरी (गु. र. नं. ३११/२०२६)
दि. १७ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे (रा. माळशिरस) या बसने प्रवास करत असताना, पंढरपूर बस स्थानकावर अज्ञात चोराने त्यांचे २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ₹३,४५,०००/-) चोरले होते. पोलिसांनी शहरातील ३६ ते ४० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. याप्रकरणी पोलिसांनी प्रिया रवींद्र काळे (वय ३० वर्ष, रा. राजापूर, ता. मंगळवेढा), संदीप युवराज मोरे (वय २६ वर्ष, रा. विजापूर रोड, सोलापूर) यांना अटक केली असून, आरोपींकडून चोरीला गेलेला १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
लग्नकार्यात दागिन्यांवर डल्ला (गु. र. क्र. २८४/२०२६)
दि. ३ मे २०२६ रोजी फिर्यादी मुकुंद संजय चव्हाण (रा. सुस्ते, ता. पंढरपूर) हे ‘श्रीराम मंगल कार्यालय’ (इस बावी, पंढरपूर) येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. तिथे गर्दीचा फायदा घेऊन नवरीच्या आईजवळील बॅगेतून ३६.४९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, मिनी गंठण, चोकर्स – किंमत ₹५,४०,०००/-) चोरीला गेले होते. पोलिसांनी पंढरपूर शहर व इतर गावांमधील ६५ ते ७० सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. तसेच सीडीआर (CDR), एसडीआर (SDR) आणि मोबाईल टॉवरचे विश्लेषण केले.
याप्रकरणी पोलिसांनी संदीप युवराज मोरे (वय २६ वर्ष, रा. विजापूर रोड, सोलापूर) याला अटक केली असून, या गुन्ह्यातील देखील १००% सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
बसमधील चोरट्यांचा २४ तासांच्या आत छडा (गु. र. क्र. ४३२/२०२६)
दि. २७ जून २०२६ रोजी फिर्यादी स्वाती भारत डुकरे (रा. आंबी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या पंढरपूर बस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर बसमध्ये चढत असताना, गर्दीत त्यांचे ३ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र (किंमत ₹४५,०००/-) चोरीला गेले.पंढरपूर पोलिसांनी २४ तासांच्या आत तत्परता दाखवत ४० ते ४५ सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपी महिला चांदणी हिरु भोसले (वय २० वर्ष, रा. वडगाव गुप्ता, जि. अहिल्यानगर) चोरट्याला जेरबंद केले. या गुन्ह्यातील १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असा सर्व कारवाईत मिळून एकूण सोन्याचे दागिने: ६७.४९९ ग्रॅम अंदाजे ९,३०,०००/- (नऊ लाख तीस हजार रुपये) जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पंढरपूर विभाग) प्रशांत डगळे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डीबी (DB) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गोसावी, शरद कदम, पोलीस अंमलदार सिरमा गोडसे, उबाळे, सचिन हेंबाडे, पाटील, साहिल तांबोळी, कृष्णा पकाले, शहाजी मंडले, नवले, बजरंग बिचुकले, हर्षद ठाकर, लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे रतन जाधव आणि प्रकाश वाघमारे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांमधून व भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here