सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील टिकोटा तालुक्यातील सोमदेवरहट्टी तांडा क्रमांक १ येथील श्री माता दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट समितीच्या वतीने मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, याच सोहळ्यात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य अतिथीगृहाचे (Guest House) उद्घाटन व लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांतील दिग्गज मंत्री, खासदार, आमदार आणि बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशातील व विविध राज्यांतील नामांकित नेतृत्व उपस्थित राहणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र), श्रीपाद नाईक (केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री), व्ही. सोमण्णा (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री), उदय सामंत (उद्योगमंत्री, महाराष्ट्र), संजय राठोड (मंत्री, महाराष्ट्र), रुद्रप्पा लामाणी (अध्यक्ष, कर्नाटक विधानसभा), जटोथ रामचंदर नाईक (उपसभापती, तेलंगणा), सुभाष फळदेसाई (मंत्री, गोवा सरकार) असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कर्नाटक सरकारचे मंत्री डाॅ. एम. बी. पाटील भूषवणार आहेत.
या यात्रोत्सवाला राजकीय क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातील मान्यवरांचीही मांदियाळी पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाला खासदार रमेश जिगाजिनगी, संजय दिना पाटील, धैर्यशील माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच गोव्याचे आमदार मायकल लोबो, दिलायला लोबो, महाराष्ट्रातील आमदार किरण सामंत, चंद्रदीप नरके, शेखर निकम, माजी खासदार संजय मंडलिक आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते गोविंदा हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत.
श्री माता दुर्गादेवी देवस्थानच्या या भव्य धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व तेलंगणातील भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावपूर्ण आवाहन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जगनू महाराज व सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








