नाशिक (उपसंपादक इंजि. कुबेर जाधव) | गेल्या तीन दिवसांपासून आणि विशेषतः काल रात्रभर कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीला महापूर आला आहे. चणकापूर धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला असून, विठेवाडी-सावकी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर देवळा तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गिरणा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे विठेवाडी, सावकी, भउर, खामखेडा, लोहोणेर, ढेगोनढा येथील गणपती मंदिर परिसर आदी भागांत देवळा तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात या अतिमहत्त्वाच्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने, गिरणा नदीच्या उत्तरेकडील गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे पावसाळ्यात स्थानिक जनतेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन या पुलाची उंची किमान एक मीटरने वाढवावी आणि त्यासाठी अंदाजपत्रक (Budget) तयार करून काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग (मालेगाव) आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले असून, निवेदनावर कुबेर जाधव (राज्य समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना), धनंजय बोरसे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस), ॲड. वैभव धर्मा पवार (लोकनियुक्त सरपंच, खामखेडा), ईश्वर निकम (उपसरपंच, विठेवाडी), रविंद्र शेवाळे, कैलास कोकरे, योगेश निकम (स्वाभिमानी शेतकरी संघटना), वसंत बोरसे, राहुल निकम, अमर जाधव, राजेंद्र जाधव व स्थानिक शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पुलाचा प्रश्न मार्गी लावून पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून कायमची सुटका करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.







