पारोळा (क्राईम रिपोर्टर अरविंद जाधव) | तालुक्यातील भोलाणे-बहादरपूर रस्त्यालगत असलेल्या मौजे जिराळी शिवारातील एका पोल्ट्रीफार्मवर कामाला असलेल्या २४ वर्षीय बिहारी तरुणाने झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रागीब अनवर गुलामसरवर (वय २४, मूळ रा. बारा इस्तमबरार, जि. अररिया, बिहार; सध्या रा. जिराळी, ता. पारोळा) असे मृत मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वसंतनगर-बहादरपूर रस्त्यालगत मौजे जिराळी शिवारात सध्या एका पोल्ट्रीफार्मचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बिहार राज्यातून आलेले काही मजूर काम करत आहेत. मृत रागीब अनवर हा गेल्या ४ महिन्यांपासून त्याचे वडील, भाऊ आणि काका यांच्यासह कैलास दयानंद पंजाबी यांच्या पोल्ट्रीफार्मच्या बांधकामावर सेंटिंग व मजुरीचे काम करत होता.
सोमवारी (दि. ६ जुलै) कामाला सुट्टी असल्याने तो कामावर गेला नव्हता. मात्र, दुपारच्या सुमारास तो अचानक घरातून बेपत्ता झाला. त्याच्या मोबाईलवर वारंवार कॉल करूनही तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी व सुपरवायझर अरविंद गोकुळ भिल यांनी परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
दरम्यान, मंगळवारी (दि. ७ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिराळी शिवारातील रामदास मोहन जाधव यांच्या शेताजवळ, वंजादेव नाल्याच्या काठावर असलेल्या एका झाडाला रागीबने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याला तातडीने खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृतकाचा भाऊ राशीद अश्रफ याने पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रागीबने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आले नसून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते करीत आहेत.







