भडगाव तहसील कार्यालय की वाहनतळ? बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांची होतेय मोठी कोंडी

भडगाव तहसील कार्यालय

भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनिष सोनवणे) । शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, खुद्द भडगाव तहसील कार्यालयाचा परिसर मात्र बेशिस्त पार्किंगमुळे ‘वाहनतळ’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कार्यालयाच्या आवारात आणि प्रवेशमार्गावर अस्ताव्यस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना कार्यालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

भडगाव तहसील कार्यालयाशी तालुक्यातील सुमारे ६५ गावांचा प्रशासकीय संबंध जोडलेला आहे. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी दररोज शहरासह ग्रामीण भागातून शेकडो नागरिक, वृद्ध, महिला आणि विद्यार्थी तहसील कार्यालयात येतात. मात्र, परिसरात कोणत्याही प्रकारची नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था नसल्याने उपलब्ध जागेवर हवी तशी वाहने उभी केली जातात. परिणामी, मुख्य प्रवेशमार्ग आणि कार्यालयाकडे जाणाऱ्या वाटांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून, “आम्ही तहसीलमध्ये आलोय की वाहनतळात?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शासकीय कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी प्रवेशमार्ग मोकळे आणि सुरक्षित असणे अपेक्षित असते. परंतु, येथे वाहनांचीच भरभराट असल्याने वयोवृद्ध, महिला व चालण्यास अडचण असलेल्या नागरिकांना कार्यालयात पोहोचताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे सामान्यांना होणाऱ्या या त्रासाबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

एकतर्फा प्रशासन नियमभंग करणाऱ्यांवर आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत असताना, दुसरीकडे स्वतःच्याच कार्यालयाबाहेरील बेसिस्त पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न विचारला जात आहे. वाहनांसाठी निश्चित जागा, स्वतंत्र येण्या-जाण्याच्या वाटा, पादचाऱ्यांसाठी मोकळी वाट आणि सूचना फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे.

कार्यालय परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगला आळा घालून नागरिकांसाठी मार्ग सुलभ करण्यासाठी तहसील प्रशासन नेमकी काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here