सहकारी संस्था चालवणे आणि टिकवणे ही केवळ संचालकांची नाही, तर सर्वांची जबाबदारी : वसंतराव कवाद

सहकारी संस्था

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | सध्याच्या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था चालवणे आणि टिकवणे अत्यंत अवघड झाले असून, त्या चालवणे व टिकवणे ही केवळ संचालकांचीच नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे, असे मत बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २८ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘निघोज परिसर कृषी फलोद्यान व भाजीपाला सहकारी संस्था’ची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

 

निघोज येथील गांडूळ खत प्रकल्पाच्या इमारतीत आयोजित ही सभा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच चंद्रकांत लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 यावेळी मार्गदर्शन करताना वसंतराव कवाद म्हणाले की, “सुमारे ३० वर्षांपूर्वी दिवंगत बाबासाहेब कवाद यांनी सहकाऱ्यांना एकत्रित करत अनंत अडचणींवर मात करून निघोज परिसरात अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या. या सर्व संस्था आज चांगल्या स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, काही प्रवृत्तींकडून विनाकारण तक्रारी करून या संस्थांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रवृत्तींमुळे संस्था टिकवणे अवघड झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना शेतीसाठी खते व बियाणे उधारीवर दिलीच पाहिजेत, आणि शेतकरी देखील नंतर ती उधारी प्रामाणिकपणे जमा करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सध्या शेतीचा व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला असून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. सध्याची शेती ही दलाल पद्धतीची बनली असून, उत्पादक शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्याला जास्त फायदा होतो. त्यामुळे या संस्थेने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी.”

माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की, “१९९८ मध्ये दिवंगत बाबासाहेब कवाद यांनी सुरू केलेली ही शेतकऱ्यांची कामधेनू संस्था उत्तम कार्य करत आहे. शेती निसर्गावर अवलंबून असून उधारी फक्त याच संस्थेकडे असते असे नाही, तर ती सर्व व्यावसायिकांकडे असते.”

शिरूर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे यांनी, “सहकार फक्त निघोजमध्येच पाहिला मिळतो. त्यागाशिवाय संस्था चालत नाही, ज्यांना हे जमले नाही त्या संस्था बंद पडल्या,” असे गौरवोद्गार काढले.

या वार्षिक सभेस जी.एस. महानगर बँकेचे व्हाईस चेअरमन भास्करराव कवाद, संस्थेचे व्हाईस चेअरमन अमृता रसाळ, संचालक दामू लंके, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नामदेवराव थोरात, ॲड. बाळासाहेब लामखडे, पत्रकार दत्ता उनवणे, सचिव रविंद्र रसाळ, दत्तात्रय वरखडे, देविदास लेंभे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, इतर सहकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक रामदास वरखडे यांनी अतिशय नेटकेपणाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here