सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | सातारा शहरासह लगतच्या परिसर-हात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सातारा शहर डी.बी. पथकाने जेरबंद केले आहे. या धडक कारवाईमुळे सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक १६ जुलै २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सातारा शहरातील सिध्दीविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क परिसरात पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीस्वारानने जबरदस्तीने ओढून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला सखोल तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पुणे-सातारा महामार्गावरून येऊन चोरी करून पुन्हा त्याच दिशेने पसार होणारा संशयित एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आनेवाडी आणि पाचवड परिसरात सापळा रचून ४ ऑगस्ट २०२६ रोजी संशयितास ताब्यात घेतले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयिताने सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची कबुली दिली. आरोपीने सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५८५/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५९९/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६०१/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६१६/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), सातारा तालुका पोलीस ठाणे: गु.र.नं. ३०९/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २१२/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी), शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २२०/२०२६ (मनी मंगळसूत्र चोरी) हे सात गुन्हे कबुल केले आहेत.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, सातारा शहरचे पो.नि. सचिन म्हेत्रे आणि शाहूपुरीचे पो.नि. संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथक, तसेच सायबर सेल आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरीत्या पार पाडली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यामुळे सातारा परिसरातील नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.







