दौंड शहरात मोठी कारवाई; सराईत व धोकादायक गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

दौंड

दौंड (तालुका क्राइम रिपोर्टर विकास साळुंके) | दौंड शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या एका सराईत व धोकादायक गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. रितेश भीमराव गायकवाड (वय २७, रा. भीमगर, दौंड) असे Mपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

 

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्हातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेल्या रितेश भीमराव गायकवाड याच्याविरुद्ध मारहाण, विनयभंग, दुखापत, दमदाटी, दरोडा आणि गंभीर स्वरूपाचे तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

त्याची वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विघातक कृत्ये रोखण्यासाठी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

सदर प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आरोपी रितेश भीमराव गायकवाड यास एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. या आदेशाची अंमलबजावणी करत दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे व त्यांच्या पथकाने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यास तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.

सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहा. पोलीस निरीक्षक विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक  अब्दुल ब्रिदी, श्रेणी पो.उ.नि. सागर चव्हाण तसेच दौंड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here