जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) |जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या सख्त सूचनांनुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
जळगाव शहरात वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी एक विशेष पथकाची स्थापना केली होती. यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विभोर जुलाल जाधव (रा. एरंडोल, हाल रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे एक विनापत्राची किंवा संशयास्पद हिरो डिलक्स मोटारसायकल (क्र. MH-19-BT-9433) आहे.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने तात्काळ विवरे खुर्द गाठून संशयित आरोपी विभोर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत सखोल चौकशी केली असता, त्याने ही मोटारसायकल जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी जळगाव जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, या मोटारसायकल संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील घरफोडी आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ३०,०००/- रुपये किमतीची लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नंदलाल पाटील करीत आहेत.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, भूषण पाटील आणि राहुल महाजन यांच्या पथकाने पार पाडली.







