राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड; राज्यभरातील १९० खेळाडूंचा सहभाग
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन व जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील जलतरण तलावात अत्यंत उत्साहात आणि दणक्यात पार पडली. २५ व २६ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या १९० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी टी-२० क्रिकेट टूर्नामेंट बोर्ड, दिल्लीचे उपाध्यक्ष श्री. सुभाष एस. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात उच्च यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील यशस्वी आणि विजेत्या खेळाडूंना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सागर शिंपी, महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दयानंद कुमार, सचिव श्री. राजेंद्र निंबाळते तसेच जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, आगामी राष्ट्रीय ट्रायथलॉन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंची विशेष निवड चाचणी पार पडली. निवड झालेल्या सर्व गुणवंत खेळाडूंचे यावेळी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरभक्कम शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन व नियोजन पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव श्री. कमलेश नगरकर, तसेच श्री. अभय देशमुख, श्री. बालाजी केंद्रे, श्री. यज्ञेश बागराव, श्रीमती रूपाली रेपाळे, श्री. प्रमोद परसी आणि श्री. राजीव जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. राज्यातील नवोदित व गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.







